गोठ्यात काय सुरू आहे हे पाहून चिमुकलीचे मित्र धावत गेले… पण नराधमाने दगड मारत हुसकावलं; नसरापूर प्रकरणात थरकाप उडवणारा खुलासा


पुणे : नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आता असा खुलासा समोर आला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्या वेळी ६५ वर्षीय नराधम गोठ्यात चिमुकलीवर अत्याचार करत होता, त्यावेळी परिसरात खेळणाऱ्या ४ ते ५ लहान मुलांनी हा प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. एवढंच नाही, तर त्या निष्पाप मुलांनी आपल्या मैत्रिणीला वाचवण्याचाही प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यांच्यावरच दगड फेकत त्यांना धमकावलं आणि तिथून पळवून लावलं. त्यानंतर त्याने चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार तपासातून समोर आला आहे.

१ मे रोजी नसरापूरमध्ये घडलेल्या या अमानुष घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपीने ‘वासरू दाखवतो’ असे आमिष दाखवत चिमुकलीला गोठ्यात नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, जवळच काही लहान मुले खेळत होती. गोठ्यात काहीतरी चुकीचं घडत असल्याचा संशय आल्याने ही मुले गोठ्याकडे धावत गेली.

मात्र आत सुरू असलेला प्रकार पाहून ती मुले घाबरली. त्यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण संतापलेल्या नराधमाने त्यांच्यावर दगड भिरकावले. घाबरलेली मुले तिथून पळून गेली. याचाच फायदा घेत आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पुणे ग्रामीण पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये काही मुले गोठ्याकडे जाताना आणि आरोपी त्यांना दगड मारून पळवताना स्पष्ट दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. हा तपासातील सर्वात महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी पुरावा मानला जात आहे.

पोलिसांनी या लहान मुलांची ‘ई-साक्ष’ नोंदवून घेतली असून, त्यामुळे आरोपीविरोधातील केस अधिक मजबूत झाली आहे. या नव्या पुराव्यांमुळे आरोपीला कठोर शिक्षा, अगदी फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी आता राज्यभरातून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आरोपीला पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयात ऑनलाइन पद्धतीने हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला १४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेमुळे नसरापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असून, निष्पाप चिमुकलीसाठी न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!