आई क्षणभर बेशुद्ध झाली अन् घरात घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार! दीड वर्षांचा चिमुरडा बादलीत बुडाला; दुसरीकडे बहिणीच्या लग्नाआधीच भावाचा दुर्दैवी अंत

मंडी : दिवाळीच्या सणात आनंदाचे क्षण अनुभवण्याची तयारी सुरू असतानाच दोन वेगवेगळ्या घटनांनी दोन राज्यांतील कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे आईला अचानक भोवळ आल्याने अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरड्याचा बाथरूममधील पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील झाशी येथे बहिणीच्या लग्नाची निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलासह तिघांचा अपघातात मृत्यू झाला. या घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आई बेशुद्ध, चिमुरडा बाथरूममध्ये; काही क्षणांत होत्याचं नव्हतं!
हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यात सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. अनिरुद्ध अबरोल असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. त्याची आई घरात कपडे धुत होती. कपडे धुतल्यानंतर ती वाळत घालण्यासाठी बाहेर गेली. मात्र, त्याचवेळी अचानक तिला भोवळ आली आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली.

आई बेशुद्ध असल्याचे पाहून अनिरुद्ध घरात फिरत बाथरूममध्ये गेला. तिथे पाण्याने भरलेली बादली ठेवण्यात आली होती. खेळताना तो त्या बादलीत पडला. पाण्यात बुडाल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. काही वेळाने आईला शुद्ध आली आणि तिने बाथरूममध्ये पाहिले. समोरचा प्रसंग पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

कुटुंबीयांनी तातडीने अनिरुद्धला नेरचौक येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेले. त्यानंतर त्याला मांडव रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी घटनेला दुजोरा दिला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू होती; निमंत्रण वाटायला गेलेले तिघे परतलेच नाहीत!
दुसरी घटना उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात घडली. एका घरात २५ नोव्हेंबर रोजी एकुलत्या एका बहिणीचे लग्न होणार होते. या विवाहसोहळ्याची तयारी सुरू असतानाच १५ वर्षीय राज आपल्या मित्रांसोबत लग्नपत्रिका वाटण्यासाठी बाहेर पडला होता. मात्र, घरी परतताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
ललितपूर-रक्सा बायपासवरील दुर्गापूरजवळ भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तिघांना तातडीने रुग्णालयात पोहोचवले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बहिणीच्या लग्नासाठी निमंत्रण देत आनंदाने बाहेर पडलेल्या राजच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. काही दिवसांत लग्नाच्या सनई-चौघड्यांनी गजबजणाऱ्या घरात आता आक्रोश सुरू आहे. मंडी आणि झाशीमधील या दोन घटनांनी सणासुदीच्या काळात अनेक कुटुंबांचा आनंद हिरावून घेतला आहे.
