घरच्यांशी झाला शेवटचा संवाद… अन् काही क्षणांतच होर्मुझच्या समुद्रात पुण्याच्या हेरंबचा दुर्दैवी अंत


पुणे : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज सामुद्रधुनीत झालेल्या भीषण हल्ल्यात पुण्याचे मर्चंट नेव्ही अधिकारी हेरंब करमरकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे करमरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या सागरी हद्दीतून प्रवास करणाऱ्या एम.व्ही. जीएफएस गॅलेक्सी या टँकरवर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हवाई हल्ला झाला. या हल्ल्यानंतर जहाजाच्या इंजिन रूमजवळ भीषण आग लागली. त्यावेळी हेरंब करमरकर याच भागात कार्यरत असल्याने ते बेपत्ता झाले होते. मंगळवारी कंपनीने त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती कुटुंबीयांना दिली.

या जहाजावर एकूण 24 कर्मचारी होते, त्यापैकी 11 जण भारतीय होते. ओमानच्या नौदलाने तातडीने बचावकार्य राबवत 23 जणांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र, हेरंब करमरकर यांना वाचवता आले नाही.

हल्ल्यापूर्वी हेरंब यांनी कुटुंबीयांशी फोनवर संवाद साधला होता. तोच त्यांचा शेवटचा संवाद ठरला. त्यानंतर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी मंगळवारी कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आणि घरावर शोककळा पसरली.

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ ते समुद्रात कर्तव्य बजावत होते. काही दिवसांतच सुट्टीवर पुण्यात घरी परतण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, त्याआधीच त्यांच्या निधनाची दुःखद बातमी कुटुंबीयांना मिळाली. आई-वडिलांसह नातेवाईक आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!