आषाढी वारीसाठी मोठा निर्णय! पंढरीच्या पांडुरंगाचे 24 तास दर्शन; VIP पास पूर्णपणे बंद


पंढरपूर : आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे.

यंदा 16 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे 24 तास दर्शन घेता येणार आहे. यासाठी 16 जुलै रोजी शुभ मुहूर्तावर ‘श्रीं’चा पलंग काढण्याची परंपरा पार पडणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

पलंग काढल्यानंतर श्री विठ्ठलाच्या मूर्तीमागे लोड, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीमागे तक्क्या (उशी) लावण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना 24 तास मुखदर्शन, तर 22 तास 15 मिनिटे पदस्पर्श दर्शन उपलब्ध होणार आहे.

ही व्यवस्था 3 ऑगस्ट रोजी होणाऱ्या प्रक्षाळपूजेपर्यंत कायम राहणार आहे. या काळात देवाचा काकडा आरतीसह काही राजोपचार तात्पुरते बंद राहतील. मात्र, नित्यपूजा, महानैवेद्य, गंधाक्षता आणि इतर पारंपरिक धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरू राहतील.

वारीदरम्यान श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, शासकीय महापूजा, मंदिर समितीची पाद्यपूजा तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दरम्यान, सर्वसामान्य भाविकांना विनाअडथळा दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपासून वारी संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन पास आणि सर्व प्रकारची सवलत व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

कोणत्याही लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी किंवा मंदिर समिती सदस्यांच्या शिफारशीवर व्हीआयपी प्रवेश दिला जाणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!