तुकाराम मुंढेंचा ‘ब्लड ऑडिट’चा मोठा दणका! ३८ रक्तकेंद्रांवर कठोर कारवाई; ३४ परवाने निलंबित, ४ कायमचे रद्द


मुंबई : राज्यात अन्नभेसळ आणि अमली पदार्थांविरोधातील धडक कारवाईनंतर आता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांमधील अनियमिततेविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. सुरक्षित, दर्जेदार आणि प्रमाणित रक्त नागरिकांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने करण्यात आलेल्या विशेष तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या असून, त्यानंतर ३८ संस्थांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

एफडीएकडून एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत राज्यभरातील रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांची व्यापक तपासणी करण्यात आली. या तपासणीत नियमांचे उल्लंघन, गुणवत्ता नियंत्रणातील त्रुटी, आवश्यक नोंदींमधील विसंगती, रक्त साठवणुकीसाठी आवश्यक तापमानाचे निकष न पाळणे, रक्त तपासणी प्रक्रियेतील उणिवा तसेच जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन अशा गंभीर बाबी समोर आल्या.

या पार्श्वभूमीवर २१ रक्तपेढ्या आणि १३ रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. तर दोन रक्तपेढ्या आणि दोन रक्त साठवणूक केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. राज्यात सध्या ४१३ परवानाधारक रक्तपेढ्या आणि ४६८ रक्त साठवणूक केंद्रे कार्यरत असून, त्यांच्या कामकाजावर एफडीएने अधिक कडक देखरेख सुरू केली आहे.

कारवाईचा फटका पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, सांगली, सातारा, अमरावती, वाशिमसह अनेक जिल्ह्यांतील संस्थांना बसला आहे. पुण्यातील बोरी परढी येथील पाटील हॉस्पिटल रक्त साठवण केंद्र तसेच भिवंडीतील आधार रक्त साठवण केंद्र यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. याशिवाय जून महिन्यात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या तपासानंतर माया ब्लड सेंटर आणि सर जे. जे. महानगर ब्लड सेंटर यांच्यावरही कठोर कारवाई करत त्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देताना सांगितले की, रक्त हा केवळ वैद्यकीय घटक नसून तो एखाद्या रुग्णासाठी जीवनदान ठरतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही रक्तपेढीला किंवा रक्त साठवणूक केंद्राला प्रशासनाकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही.

दरम्यान, ही मोहीम केवळ एकदाच मर्यादित न राहता पुढील काळात नियमित तसेच अचानक तपासण्यांद्वारे सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व रक्तपेढ्या आणि रक्त साठवणूक केंद्रांना गुणवत्ता, सुरक्षितता आणि वैधानिक निकषांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!