राजकारणात नवे संकेत? एकाच रात्री फडणवीसांच्या भेटीला राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे नेते; ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये मंगळवारी रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या काही भेटींनी राजकीय चर्चांना नवे वळण दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटीलही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांनी एकाच रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाबाबत चर्चा सुरू असतानाच या भेटींनी त्या चर्चांना आणखी बळ दिले आहे.
यापूर्वी पावसाळी अधिवेशनादरम्यान शरद पवार गटातील काही आमदारांनी भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाल्याचे वृत्तही समोर आले होते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या या भेटींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

मात्र, या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी कोणत्याही राजकीय घडामोडींना दुजोरा दिला नाही. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ही भेट पूर्वनियोजित होती आणि ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठीच ते ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते. तरीही, या सलग भेटींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांबाबत चर्चांना पुन्हा वेग आला आहे.
