मतदान करुन परतलेल्यांच्या बोटावरची शाई पुसली, मुंबई महापालिका निवडणुकीतील दुबार मतदान प्रकरणाने राज्यात खळबळ..

मुंबई : बोगस आणि दुबार मतदारांमुळे निवडणुकीत घोळ होणार असल्याची भीती काही राजकीय पक्षांकडून व्यक्त केली जात असताना दुसरीकडे आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मुंबईत आज सकाळी मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यंदा मतदान करणाऱ्या नागरिकांच्या बोटावर शाईऐवजी मार्करने खूण केली जात आहे. पण या मार्करची शाई बोटावरुन पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
बोटावर मार्करने खूण केल्यानंतर फक्त नखावरील शाई पुसली जात असल्याची कबुली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनीही दिली. कोल्हापूरमधील कर्मवीर इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मतदान केंद्रावरही काही मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून यंदा मतदानासाठी शाईऐवजी मार्करचे किट उपलब्ध करुन देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. हा मार्कर २०१२ पासून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वापरला जात असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट मशीन असं त्याचे नाव आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे यंत्र वापरले जाणार आहे. निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी याबाबत माहिती दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.
दरम्यान, यापूर्वी कधीही PADU मशीन वापरण्यात आले नव्हते. मग निवडणूक आयोगाने आताच हे मशीन का वापरले, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसेच मुंबईत गुरुवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली तेव्हा निवडणूक आयोगाने आणखी एक धक्कादायक निर्णय जाहीर केला.
त्यानुसार माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहे.
