पहिली नोकरी? सरकारकडून थेट खात्यात ₹15,000; जाणून घ्या पात्रता, पगाराची अट आणि नियम


नवी दिल्ली : खासगी क्षेत्रात पहिल्यांदाच नोकरी सुरू करणाऱ्या तरुणांसाठी केंद्र सरकारने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री विकास भारत रोजगार योजना (PMVBRY) अंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना ₹15,000 पर्यंतचे आर्थिक प्रोत्साहन दिले जाणार आहे. या योजनेमुळे लाखो तरुणांना औपचारिक रोजगार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी मदत मिळणार असून सरकारने यासाठी तब्बल ₹99,446 कोटींची तरतूद केली आहे.

योजनेअंतर्गत पहिल्यांदा खासगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या एका महिन्याच्या पगाराएवढे प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, या लाभासाठी मासिक एकूण वेतन ₹1 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित नोकरी 1 ऑगस्ट 2025 ते 31 जुलै 2027 या कालावधीत सुरू झालेली असावी.

या आर्थिक सहाय्याची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. ही रक्कम दोन टप्प्यांत मिळणार आहे. नोकरीत सलग सहा महिने सेवा पूर्ण झाल्यानंतर पहिला हप्ता दिला जाईल. त्यानंतर 12 महिने सेवा पूर्ण करून शासनाने निश्चित केलेला आर्थिक साक्षरता कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर दुसरा हप्ता मिळेल.

मात्र, सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसतील, कारण त्यांचा समावेश EPFO ऐवजी NPS किंवा GPF व्यवस्थेत होतो. त्यामुळे ही योजना प्रामुख्याने खासगी आणि औपचारिक क्षेत्रातील नव्या कर्मचाऱ्यांसाठीच लागू राहणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीही पूर्ण कराव्या लागतील. नव्या कर्मचाऱ्यांनी EPFO अंतर्गत नोंदणी करून फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) च्या माध्यमातून UAN पडताळणी करणे बंधनकारक असेल. तसेच बँक खाते आधार किंवा अधिकृत ओळखपत्राशी जोडलेले असणे आणि DBT व्यवहार सुरू असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत त्रुटी असल्यास लाभार्थ्यांना संबंधित बँक शाखेशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही योजना आर्थिक मदतीसोबतच औपचारिक रोजगार क्षेत्रात स्थिरपणे पाऊल ठेवण्याची मोठी संधी मानली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!