होणाऱ्या नवऱ्याचा भूतकाळ समजला, १० लाख गेले अन्… पुण्यात डॉक्टर तरुणीने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

पुणे : पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एका २५ वर्षीय डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्या तरुणासोबत लग्नाचं स्वप्न रंगवले होते, त्याच तरुणाने धोका दिल्याच्या कारणातून पीडित डॉक्टरने विषारी औषध पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे.
पहिलं लग्न झालेलं असतानाही आपण अविवाहित असल्याचं भासवून एका तरुणाने डॉक्टर युवतीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर वेळोवेळी तिच्याकडून थोडेथोडके नव्हे, तर तब्बल दहा लाख रुपये उकळले.
मात्र एके दिवशी तरुणाने डॉक्टरला आपलं लग्न झाले असल्याचे सांगितले. इतकंच नाही, तर आपली पत्नी गर्भवती असल्याचंही तो म्हणाला. या गोष्टीचा जबर मानसिक धक्का बसल्याने डॉक्टर तरुणीने टोकाचं पाऊल उचलले.
पल्लवी पोपट फडतरे (वय. २५ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. या प्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंत (वय. ३० वर्ष) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी कुलदीप याने विवाहित असूनही मेट्रीमोनियल साइट जीवनसाथी डॉट कॉमवर रजिस्ट्रेशन केलं होतं. याच वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी पीडितेशी संपर्क साधला होता. तसेच आपण लग्नासाठी इच्छुक असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितलं.
सुरुवातीला पीडित महिला डॉक्टरने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला. मात्र आरोपीनं पीडितेशी संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला. तिला लग्न करण्याचं आमिष दाखवत तिच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेतले.
ज्यावेळी तरुणीने आरोपीकडे लग्नासाठी विचारणा केली, तेव्हा आरोपीनं लग्न करण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच आपण विवाहित असून पत्नी गर्भवती असल्याचं आरोपीनं पीडितेला सांगितले. होणाऱ्या पतीचा हा भूतकाळ समजल्यानंतर पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला.
एवढेच नव्हे तर आरोपीनं पीडितेकडून घेतलेले दहा लाख रुपये परत देण्यास देखील टाळाटाळ केली. यातून नैराश्य आल्यानंतर पीडित डॉक्टर तरुणीने ७ जानेवारीला क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.