स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला, कुठे होणार युती अन् कुठे लढणार स्वबळावर?

मुंबई : राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता, या निवडणुका प्रचंड प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, मात्र अजूनही या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार याबाबत कोणतंही चित्र स्पष्ट नाही आहे.

महायुतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, तर मुंबई बाहेर संपूर्ण राज्यात महायुतीतील सर्व पक्ष स्वबळावर लढणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्रितपणे सामना करणार असून, या युतीचा उद्देश बीएमसीवरील सत्तेवर पुन्हा ताबा मिळवणे हा आहे.
महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या चर्चेनंतर ठरले की, मोठ्या महानगरपालिका विशेषतः मुंबई महापालिका तिन्ही पक्ष एकत्र येऊन लढतील. मात्र, इतर शहरांमध्ये आणि तालुकास्तरावरच्या नगरपालिकांमध्ये किंवा नगरपंचायतींमध्ये पक्षांना स्वबळावर लढण्याची मुभा असेल.
म्हणजेच स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य दिले जाईल आणि स्थानिक समीकरणांनुसार उमेदवार ठरवले जातील. निवडणुकीनंतर मात्र महायुतीचे तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी समन्वय साधतील, अशीही या बैठकीत भूमिका मांडण्यात आली आहे.
या निर्णयामुळे राज्यातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो. कारण आतापर्यंत मुंबईत शिवसेना एकटीच सत्ता चालवत होती, पण २०२२ नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिंदे गट आणि भाजप यांनी मिळून महायुती मजबूत केली आहे आणि आता अजित पवार यांच्या एनसीपीच्या सहभागामुळे ती अधिक बलवान झाली आहे. त्यामुळे बीएमसी निवडणुकीत विरोधकांना विशेषतः उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, मुंबईतील सत्ता परत मिळवण्यासाठी हा एक रणनीतिक पाऊल असून, या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, काही ठिकाणी स्थानिक पातळीवर पक्षांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तरीसुद्धा, महायुतीने बीएमसी आणि इतर महानगरपालिकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तयारीचा बिगुल वाजवला आहे, हे निश्चित आहे.
