राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा २ लाख रुपये करणार – अतुल सावे*

पुणे : समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची मर्यादा १ लाख रुपयांवरून २ लाख रुपये करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा मंत्री अतुल सावे यांनी यावेळी केली.
भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जन्मस्थळी त्यांच्या २३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्या नंतर जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार रामराव वडकुते, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे, कर्नाटकचे प्रसन्न नंदपुरी महास्वामी महाराज, माजी आमदार संजय जगताप, शहाजी बापू पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अतुल सावे म्हणाले, राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून रामोशी, बेडर आणि वाल्मिकी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास बहुजन विकास विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे ७६ वसतिगृहे सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ३१ ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ७५ करण्यात आली असून, लवकरच १०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील ९८० आश्रमशाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना डिजिटल वर्ग, सौरऊर्जा, वॉशिंग मशीन यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधार योजनेंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असून, महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून देण्यात येत आहे. वनार्टीअंतर्गत सहा आणि इतर मागास बहुजन विकास विभागांतर्गत १४ आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे.
समाजातील युवक, महिला आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळामार्फत २५ टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन युवकांनी व महिलांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन मंत्री श्री. सावे यांनी केले. गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चित्रफिती द्वारे संदेश*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशातून राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला अभिवादन केले. देशाच्या इतिहासात रामोशी समाजाचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी या समाजाने जवळपास चारशे वर्षे परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात बहिर्जी नाईकांसारख्या शूर योद्ध्यांनी आणि पुढे इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्राच्या मातीत राजे उमाजी नाईक यांनी राष्ट्रभक्तीची तेजस्वी ज्योत प्रज्वलित ठेवली.
राजे उमाजी नाईक हे केवळ आद्य क्रांतिकारक नव्हते, तर धैर्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. त्यांच्या विचारांमध्ये स्वराज्याची आस होती. इंग्रज सत्तेला आव्हान देत त्यांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटवली. अवघ्या ४१ व्या वर्षी त्यांनी मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. त्यांचे जीवन आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
समाजाच्या मागणीनुसार राज्य शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील तरुणांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक व्हावे, यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार’ आणि त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजासमोरील अडचणींचे संधीत रूपांतर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही फडणवीस म्हणाले.