बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार! सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत युगेंद्र पवारांचा शरद पवारांच्या पक्षाकडून एल्गार, सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान..

बारामती : बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय ठिणगी पडली आहे! विधानसभा निवडणुकीनंतर आता थेट सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील संघर्षाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पूर्ण ताकदीने पॅनेल उभे करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी बारामतीत पत्रकार परिषदेत केली.
युगेंद्र पवार यांनी सांगितले की, कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुरंदर आणि खंडाळा तालुक्यांतील गावांमध्ये जाऊन सभासदांशी चर्चा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या मेळाव्यातही सभासद आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमेश्वर कारखान्यावर शरद पवारांनी लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

युगेंद्र पवारांच्या म्हणण्यानुसार, पॅनेलमध्ये अनुभवी व्यक्तींसोबतच नवीन आणि योग्य चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. अनेक वर्षांपासून तेच चेहरे कारखान्यात असल्याने आता बदलाची गरज असल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली आहे. त्याचा आदर करून कारखाना आणि सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवून पॅनेल तयार केले जाणार आहे. येत्या दोन-तीन दिवसांत इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित केले जाणार आहेत.


दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्याबाबत अद्याप समोरून कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे युगेंद्र पवार यांनी सांगितले. असा प्रस्ताव भविष्यात आल्यास तो शरद पवार यांच्यासमोर मांडला जाईल आणि ते जो निर्णय देतील, तो मान्य असेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
विशेष म्हणजे, ही निवडणूक केवळ ‘पवार विरुद्ध पवार’ करण्याचा आपला उद्देश नसल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे. सुनेत्रा पवार यांच्याबाबत कोणताही वैयक्तिक आक्षेप नसून विद्यमान कारभाराबाबत प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी सभासदांना सक्षम पर्याय देणे आणि लोकशाही पद्धतीने बदल घडवून आणणे हा आपला उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊसाला योग्य दर, साखरेचा दर्जा, नियोजनानुसार ऊसतोड, गुणवत्तेच्या आधारे कामगार भरती आणि पारदर्शक कारभार हे प्रमुख मुद्दे घेऊन सभासदांपर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घडामोडीमुळे बारामतीतील मागील निवडणुकांचीही चर्चा सुरू झाली आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात लढत झाली होती. त्यानंतर माळेगावच्या निवडणुकीतही पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. आता सोमेश्वरच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या गटासमोर युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनेल उभे राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी मेळावा घेत सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. अजित पवार यांच्या विचारांनीच कारखान्याची वाटचाल पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्यामुळे युगेंद्र पवारांच्या स्वतंत्र पॅनेलच्या घोषणेनंतर आता सोमेश्वरच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे अधिक रंगण्याची शक्यता आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक प्रशासनाने जाहीर केली आहे. ११ ऑक्टोबरला मतदान, तर १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यांतील सुमारे १५० गावांमध्ये आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता परिसरातील सहकार आणि राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार आहे.