“गावाकडच्या गॅस ग्राहकांची 45 दिवसांची प्रतीक्षा संपली! केंद्राचा मोठा निर्णय; आता 25 दिवसांतच रिफिल बुकिंग”

पुणे : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. सिलेंडर रिफिल बुक करण्यासाठी ग्रामीण ग्राहकांना यापुढे 45 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार नाही. केंद्र सरकारने ग्रामीण आणि शहरी भागातील बुकिंगचा कालावधी समान करत आता दोन्ही ठिकाणी 25 दिवसांचे अंतर निश्चित केले आहे. 7 सप्टेंबर 2026 रोजी या बदलाचे निर्देश देण्यात आले असून, तेल विपणन कंपन्यांना त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
नेमका बदल काय झाला?

काही महिन्यांपूर्वी एलपीजीच्या पुरवठ्यावर मोठा दबाव निर्माण झाला होता. पश्चिम आशियातील संघर्ष आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत एलपीजी उपलब्धतेवर परिणाम झाला होता. त्यामुळे पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ग्रामीण ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंगमध्ये 45 दिवसांचे अंतर करण्यात आले होते. त्यावेळी शहरी ग्राहकांना 25 दिवसांनंतर रिफिल बुक करण्याची मुभा होती. मार्च 2026 मध्ये ग्रामीण भागासाठी 45 दिवसांचा कालावधी लागू करण्यात आला होता.


आता परिस्थिती बदलली आहे. देशातील एलपीजी पुरवठा सुधारला असून रिफिल बुकिंगचा अनुशेषही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे पूर्वी लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी या निर्णयाची माहिती दिली. पेट्रोलियम मंत्रालयाने इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्रमुखांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
ग्रामीण ग्राहकांना याचा फायदा कसा होणार?
आता ग्रामीण भागातील ग्राहकाने एखाद्या महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडर बुक केला, तर पुढील रिफिलसाठी 45 दिवस थांबण्याची गरज नाही. 25 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 26 तारखेपासून पुढील सिलेंडर बुक करता येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना शहरी ग्राहकांप्रमाणेच रिफिल बुकिंगची सुविधा मिळणार आहे.
दरम्यान, एलपीजी पुरवठ्यावरील ताण कमी करण्यासाठी सरकारने यापूर्वी विविध उपाययोजना केल्या होत्या. काही शहरांमध्ये एलपीजीला पर्याय म्हणून पीएनजी कनेक्शनचा वापर वाढवण्यावरही भर देण्यात आला. ज्या ग्राहकांकडे पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन होते, त्यांच्याबाबत एलपीजी कनेक्शन सरेंडर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, आता देशातील घरगुती एलपीजी पुरवठ्याची स्थिती सुधारल्याने ग्रामीण ग्राहकांवरील 45 दिवसांची प्रतीक्षा अखेर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे 7 सप्टेंबरपासून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील घरगुती ग्राहकांना 25 दिवसांच्या अंतराने एलपीजी रिफिल बुक करता येणार आहे.