भोंदूगिरीचा फुगा फुटला; मन्यामामा उर्फ मनोहर भोसलेच्या घोटी येथील आश्रमावर बंदीचा निर्णय ठरला!


सोलापूर : जादूटोणा आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या मन्यामामा उर्फ मनोहर भोसले याच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथील आलिशान आश्रमावर आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

घोटी ग्रामपंचायतीचे सरपंच विलासराव राऊत यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना लेखी पत्र देत हा आश्रम कायमस्वरूपी बंद करण्याची आणि सखोल चौकशी करण्याची ठोस मागणी केली आहे. फसवणूक आणि इतर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत ग्रामपंचायतीने घेतलेली ही आक्रमक भूमिका लक्षवेधी ठरली आहे.

गावपातळीवरून सुरू झालेला हा विरोध आता पोलीस प्रशासनावर निर्णायक कारवाईचा दबाव निर्माण करत आहे. सरपंचांनी दिलेल्या पत्रानुसार, भोसले गेल्या पाच वर्षांपासून सुमारे २७ एकरांवर पसरलेल्या या आश्रमातून तथाकथित धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवत होता. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, भविष्य सांगणे, जादूटोणा करणे अशा प्रकारांद्वारे लोकांची दिशाभूल केली जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

या आश्रमात केवळ स्थानिकच नव्हे तर परराज्यातील लोकही वास्तव्यास असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, गावातील नागरिक या आश्रमापासून दूर राहतात आणि भोसलेशी कोणताही संबंध ठेवत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय, काही राजकीय नेते आणि विविध क्षेत्रांतील सेलिब्रिटी व्यक्तींचीही आश्रमात वर्दळ असल्याची चर्चा पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले असून आश्रमातून नेमके कोणते व्यवहार चालत होते, याची चौकशी करण्याची मागणी तीव्र झाली आहे.

दरम्यान, मनोहर भोसलेविरोधात सध्या फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, यापूर्वीही महिलेशी संबंधित गंभीर अत्याचाराचा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. त्यामुळे हा केवळ अंधश्रद्धेचा मुद्दा नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांशी संबंधित असल्याचे स्पष्ट होत आहे.

इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी असलेला भोसले सुरुवातीला आठवडी बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. त्यानंतर स्वतःला संत बाळूमामांचा आशीर्वाद लाभल्याचा दावा करत त्याने धार्मिक वेश परिधान केला आणि उंदरगाव परिसरात पहिला मठ उभारला.

अमावस्या-पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होऊ लागल्याने त्याचा प्रभाव झपाट्याने वाढला. अनेक राजकीय नेत्यांसोबतचे त्याचे फोटोही समोर आले होते. यापूर्वी करमाळा-इंदापूर सीमेवरील उंदरगाव येथील त्याचा आश्रम गुन्हा दाखल झाल्यानंतर बंद करण्यात आला होता.

आता घोटी येथील आश्रमावरही कारवाई होणार का, याकडे संपूर्ण करमाळा तालुक्याचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायतीच्या ठोस भूमिकेमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!