मोठी बातमी! अखेर तारीख ठरली; शरद पवार स्वतः मैदानात उतरणार, २६ सप्टेंबरला पंढरपुरात दुष्काळ आक्रोश मोर्चा, वातावरण तापणार

पुणे : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगामी काळात पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली २६ सप्टेंबर रोजी पंढरपुरात दुष्काळ आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत माहिती दिली. “सरकारला सद्बुद्धी देवो,” असे विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी मोर्चापूर्वी आमदार आणि खासदार विठ्ठल मंदिरात जाणार आहेत. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळ आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, पाणी आणि चाऱ्याची संभाव्य टंचाई तसेच संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. शरद पवार यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ जाहीर करण्यासह शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या केल्या आहेत.
दोन आमदार बैठकीला गैरहजर
दुष्काळ आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी पंढरपुरात बैठक घेण्यात आली. या बैठकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या बैठकीला आमदार उत्तम जानकर आणि आमदार नारायण पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीची चर्चा सुरू झाली आहे.
फडणवीसांकडून दुष्काळी भागाची पाहणी
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी सुरू केली आहे. त्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूरमधील प्रभावित भागांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. या भागात पिकांचे मोठे नुकसान झाले असून पाणी आणि चाऱ्याची चिंता असल्याचेही समोर आले आहे. फडणवीस यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
शनिवारपूर्वी दुष्काळाचा जीआर
दुष्काळाच्या परिस्थितीवर राज्य सरकारकडून महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारपूर्वी दुष्काळासंदर्भातील जीआर काढण्यात येईल, असे सांगितले आहे. या जीआरनंतर मदत आणि उपाययोजनांना गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतूनही तातडीने मदत करण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.