अजितदादांच्या निधनानंतर पहिल्याच निवडणुकीत ‘तो’ डाव! सुनेत्रा पवार संतापल्या, जगतापांना सुनावलं; म्हणाल्या, ‘अंधारात ठेवून संधी साधली’

बारामती : अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पहिली निवडणूक रंगात आली असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच आपल्याला अंधारात ठेवून ऐनवेळी संधी साधल्याचा आरोप सुनेत्रा पवार यांनी सभेत केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीतील संघर्ष पुन्हा चर्चेत आला आहे.
‘दादांची शिकवण होती, रडायचं नाही, लढायचं’

सभेत बोलताना सुनेत्रा पवार भावुक झाल्या. अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिली निवडणूक असल्याचे सांगत त्यांनी, “आपण सर्वजण पोरके झालो, आम्ही जास्त पोरके झालो,” अशी भावना व्यक्त केली. मात्र, दुःखात खचून न जाता संघर्ष करण्याची अजित पवार यांची शिकवण असल्याचे सांगत त्यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.


‘दादांची प्रेरणा की अडचण?’
विश्वासू सहकाऱ्यांवर निशाणा साधताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ज्यांच्यावर भरोसा ठेवला, त्यांनी आधीपासून तयारी केली होती; मात्र आपल्याला त्याची कल्पना दिली नाही. नाव न घेता त्यांनी संबंधितांना सवाल केला की, अजितदादा खरोखरच त्यांची प्रेरणा होते की त्यांची उपस्थिती अडचणीची वाटत होती? अजित पवार यांचे छायाचित्र, आवाज आणि स्वतःच्या आवाजाचाही वापर करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी, “सर्वांना कोण भुलवतं आहे? कुठलं मार्केटिंग सुरू आहे?” असा सवाल उपस्थित केला.
पुरुषोत्तम जगतापांना ‘ताटाखालचं मांजर’ म्हणत टोला
कारखान्याच्या पुढील पॅनेलमधील उमेदवारांवरही त्यांनी टीका केली. पाच उमेदवार जुने असून इतर नवीन असल्याचे सांगत, कारखान्याचा कारभार समजून घेईपर्यंत त्यांची मुदत संपेल, अशी टिप्पणी त्यांनी केली. कारखान्यात स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागणारेच लोक हवे आहेत, असा टोला त्यांनी जगताप यांना लगावला.
‘शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहीन’
सभेदरम्यान अजित पवार यांनी कुटुंबाला वेळ देण्याचा शब्द दिल्याची आठवण सांगताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. “तुमची ही वहिनी शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहील,” असे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. अजित पवार यांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक, पुरुषोत्तम जगताप यांची वेगळी भूमिका आणि सुनेत्रा पवार यांचे आरोप यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीकडे बारामतीचे लक्ष लागले आहे. आता मतदार कोणाला कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
