पुणेकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा! उन्हाळ्यापूर्वीच पाणीकपातीचा निर्णय, १५ ऑक्टोबरपासून नवे निर्बंध

पुणे : पावसाळा संपताच पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसमोर पाणीटंचाईचं संकट उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळा सुरू होण्यास अद्याप काही महिने बाकी असतानाच जलसंपदा विभागाने पाणीकपातीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
येत्या १५ ऑक्टोबरपासून दरमहा १० टक्के पाणीकपात लागू करण्याचे आदेश महापालिका आणि औद्योगिक क्षेत्रांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, खडकवासला धरणसाखळीत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा उपलब्ध असतानाही भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे.

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान


‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पावसाच्या अनिश्चिततेची चिंता व्यक्त केली जात आहे. खडकवासला धरणसाखळीत सध्या २६.४२ टीएमसी म्हणजेच ९०.६४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरवण्याचं आव्हान जलसंपदा विभागासमोर आहे.
या पार्श्वभूमीवर खडकवासला पाटबंधारे विभागाने पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच चिंचवड, हिंजवडी आणि कुरकुंभ एमआयडीसीला अधिकृत पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे १५ ऑक्टोबरपासून दरमहा १० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कडक सूचना
जलसंपदा विभागाने पाण्याचा अपव्यय आणि गळती रोखण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती थांबवण्यासोबतच अनधिकृत पाणीवापराचं सर्वेक्षण करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच पिण्याच्या पाण्याचा वापर अनावश्यक कामांसाठी होऊ नये, यासाठी उद्याने, रस्त्यांच्या दुभाजकांवरील हिरवळ, बांधकामं आणि औद्योगिक प्रक्रियांमध्ये केवळ प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महापालिका पुढील निर्णय घेणार
यासंदर्भात जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी पाणीकपातीबाबत महापालिका आणि औद्योगिक क्षेत्रांना अधिकृत पत्र पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. १५ ऑक्टोबरपासून दरमहा १० टक्के कपातीची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनीही जलसंपदा विभागाकडून पाणीकपातीसंदर्भातील पत्र प्राप्त झाल्याचं सांगितलं. हे पत्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, सोमवारनंतर याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
उन्हाळ्यापूर्वीच पाणीकपातीचे आदेश आल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील पाणीपुरवठ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि अनावश्यक अपव्यय टाळावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
