दिल्ली विमानतळावर पोलिसांनी पकडलं, अन् त्याचवेळी घरातून आली दुःखद बातमी; अभिजीत दीपकेंच्या आजींचं निधन, अंत्यदर्शन होणार का?


हिंगोली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्ली गाठणारे कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांच्यावर संकट कोसळलं आहे. दिल्ली विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्याचदरम्यान त्यांच्या आजींच्या निधनाची बातमी समोर आली. हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी या मूळ गावी अभिजीत यांच्या आजींचं दीर्घ आजाराने निधन झालं. या घटनेमुळे दीपके कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मात्र, अभिजीत यांना ही बातमी समजली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अभिजीत यांच्या आजी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. वय आणि दीर्घ आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिजीत यांचे वडील भगवान दीपके आणि आई अनिता हे छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती आहे. आजीच्या निधनानंतर ते हिंगोलीला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यांच्या घराभोवतीही पोलिसांचा बंदोबस्त असल्याचं वृत्त आहे.

आंदोलनासाठी दिल्ली गाठली, पण विमानतळावरच ताब्यात

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कथित निवडणूक गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून अभिजीत दीपके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ते मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. मात्र, दिल्ली विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना कोणत्या पोलीस ठाण्यात नेण्यात आलं, याबाबत सुरुवातीला अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

आजीची शेवटची भेट झाली होती?

अभिजीत दीपके गेल्या आठ दिवसांपासून घरापासून दूर होते. गेल्या आठवड्यात मुंबईत आंदोलनासाठी आल्यानंतर ते कुटुंबीयांच्या संपर्कात प्रामुख्याने फोनवरून होते. छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना त्यांनी आजीची शेवटची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्यांची आजीशी प्रत्यक्ष भेट झाली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

आता आजीच्या निधनानंतर अभिजीत यांना कुटुंबीयांपर्यंत पोहोचता येणार का, तसेच अंत्यविधीसाठी हिंगोलीला जाता येणार का, याकडे लक्ष लागलं आहे. आंदोलनासाठी दिल्लीला गेलेल्या अभिजीत यांच्याबाबत घडलेल्या या घटनांमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!