पुण्यात वातावरण तापलं ; भाजप नेत्यांमधला ऑनलाईन वाद पोहचला थेट पोलीस स्टेशनात

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडी जोमाने तयारीला लागली आहे. सत्ता स्थापनेसाठी विरोधकांना आपल्या बाजूला ओढण्याचं धोरण अवलंबणाऱ्या भाजपमधील संघर्ष आता दिसून येऊ लागला आहे. बैठकीचा संदेश न मिळाल्यामुळे भाजप नेत्याने अधिकृत पक्षाच्या सोशल मीडिया ग्रुपवर नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे हा संघर्ष आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचा पारंपारिक गड मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यात भाजपला अस्तित्व मजबूत करायच आहे.तरी स्थानिक स्तरावर वाढत्या गटबाजीमुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने तालुक्यात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीचा संदेश बेलदरे यांना न मिळाल्यामुळे त्यांनी अधिकृत पक्षाच्या सोशल मीडिया ग्रुपवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचे समोर आले आहे. या वादात रेणुसे यांनी अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप बेलदरे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला.

राजगड तालुक्यातील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम बेलदरे यांनी तालुकाध्यक्ष राजू रेणुसे यांच्या विरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या या तक्रारीत बेलदरे यांनी रेणुसे यांच्यावर फोनवरून दमदाटी, शिवीगाळ आणि मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

