इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरेंना शेवटी बसवलं, टीका करणाऱ्यांवर संजय राऊत तुटून पडले, मागे बसण्याचे खरं कारणही सांगितले

नवी दिल्ली : इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक काल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी बोलावली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. ठाकरे कुटुंब सध्या दिल्ली दौऱ्यावर आहे.

यावेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याचे दिसून आले. यावरून ठाकरे गटाला खिंडीत पकडण्याचे काम शिंदे गट आणि भाजपकडून केला जात आहे. या सगळ्यांना आता संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. मागे बसल्याची टीका करणारे लोक फालतू आहेत. समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन होत होते.
उद्धवजींना पुढे बसवले होते. पण, त्यांचे म्हणणे पडले की स्क्रीनच्या समोर बसून पाहताना त्रास होतो किंवा नीट दिसत नाही. त्यामुळे आम्ही सर्वच पाठीमागे गेलो. हे भाजपचे आयटी सेलवाले फालतू लोक आहेत. त्यांना समजायला हवे. उद्धव ठाकरेंचे अजून पण फोटो आहेत, ते तुम्ही पाहिले नाहीत का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी, आदित्य ठाकरे यांना राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी त्यांचा नवीन घर संपूर्ण दाखवलं. त्या ठिकाणी प्रेझेंटेशन सुरू होते. मी स्वतः तिथे होतो. शरद पवार देखील आमच्या सोबत बसले होते. प्रमुख नेत्यांना पुढे बसवले होते. उद्धव ठाकरे म्हणाले इथून दिसणार नाही. त्यामुळे ते मागे आले होते, असेही ते म्हणाले.

याबाबत फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करत निशाणा साधायला सुरुवात केली होती. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत ठाकरे लाचार झाल्याचे शिंदे गटाने म्हटले होते.