विद्यार्थी आंदोलनामुळे दिल्लीत तणाव! पोलिस कारवाईनंतर अण्णा हजारे मैदानात; सरकारसमोर मांडणार मोठी मागणी


मुंबई : नवी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत आहे. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर आंदोलन अधिक तीव्र झाले असून आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतरवर मागील काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आंदोलकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आल्याचे तसेच काही जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचे पडसाद देशभरात उमटू लागले असून विविध राज्यांमध्ये निषेध आंदोलन सुरू झाले आहे.

दरम्यान, आंदोलनात सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जंतर-मंतरवरून रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. या घटनेनंतर आंदोलनाला आणखी वेग आला असून विविध सामाजिक संघटना आणि अनेक मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज सकाळी 11 ते 1 या वेळेत अहिल्यानगर (नगर) येथील वाडिया पार्कमधील गांधी स्मारकात मौन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत सरकारने दडपशाहीचा मार्ग न स्वीकारता विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकशाहीत संवाद आणि शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवणे आवश्यक असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले. तसेच या आंदोलनस्थळाला प्रतीकात्मक स्वरूपात “नगरचे जंतर-मंतर” असे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्लीतील आंदोलनानंतर आता अण्णा हजारेंच्या या भूमिकेकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!