एकट्याला खोलीत न्यायचा अन्…; मुंबईतील नामांकित शाळेत शिपायानं 6 वर्षीय विद्यार्थ्यासोबत केले धक्कादायक कृत्य

मुंबई : मुंबईतील गोवंडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका प्रतिष्ठित शाळेत काम करणाऱ्या 45 वर्षीय शिपायाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत असभ्य आणि अश्लील वर्तन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी शिपायाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोवंडीतील एका नामांकित शाळेत हा संतापजनक प्रकार घडला. शाळेतील ४५ वर्षीय शिपायाने एका निरागस विद्यार्थ्याच्या हतबलतेचा फायदा घेत त्याच्यासोबत अश्लील चाळे केले.
पीडित विद्यार्थ्याने ही बाब आपल्या पालकांच्या कानावर घातल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. पालकांनी वेळ न घालवता थेट पोलीस ठाणे गाठून या नराधमाविरोधात तक्रार दाखल केली.

पालकांच्या तक्रारीवरून गोवंडी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह ‘पॉक्सो’ ( कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत. एका नामांकित शाळेत असा प्रकार घडल्याने शाळेच्या प्रशासनावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पालकांनी शाळेबाहेर गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला.

बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारने शाळांसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. मात्र, त्यानंतरही अशा घटना थांबत नसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “ज्यांच्यावर मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे, तेच जर असे कृत्य करत असतील, तर मुलांनी कोणाकडे पाहायचे?” असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.