स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपीच्या व्हाट्सअप डीपीवर ‘या’ आमदाराचा फोटो, मोबाईल बघून सगळेच हादरले…

पुणे : स्वारगेट येथील बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणी धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. आरोपी दत्तात्रय गाडेचे काही राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
शिरुरचे माजी आमदार अशोक पवार यांचा एक बॅनर लागला आहे. त्या राजकीय बॅनरवर आरोपी दत्तात्रय गाडेचा फोटो आहे. तसेच दत्तात्रय गाडेच्या व्हॉट्स App डीपीवर आमदार माऊली कटकेचा फोटो आहे. आरोपी दत्तात्रय गाडे गावात आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता म्हणून फिरत असायचा अशी माहिती समोर आली आहे.
पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. आरोपीवर अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. आरोपी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 13 टीम्स तयार केल्या आहेत. आरोपीच गुन्हेगारीशी जुनं नातं आहे. तो जामिनावर बाहेर आला होता. त्यावेळी त्याने हा दुसरा गुन्हा केला. दत्तात्रय गाडे 2019 जामिनावर बाहेर आला होता.
आरोपी दत्तात्रय गाडेवर पुण्याच्या स्वारगेट एसटी डेपोत एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तो घटनेनंतर घरी देखील आला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास एक लाखाचे बक्षीस देखील जाहीर केले आहे.
याबाबत पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आणि तरुणीने दिलेल्या माहितीवरुन आरोपीची ओळख पटवली. दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही. मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांना यासंदर्भात व्यक्तिशः लक्ष घालून तपास करण्याचे, आरोपीला तात्काळ अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हा गुन्हा गांभीर्याने घेतला असून पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. पोलिसांकडून आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल यासाठी राज्य शासन सर्व पावले उचलेल, हा विश्वास महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनी, मातांना देतो, असे अजित पवार म्हणाले.