दोनदा गर्भपाताचा दबाव, कॉपर-टी आणि चारचाकीसाठी छळ? सासवडच्या विवाहितेची पती-सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार


सासवड : लग्नानंतर हुंड्यासाठी पैशांची तसेच चारचाकी वाहनाची मागणी, चारित्र्यावर संशय, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप करत 33 वर्षीय विवाहितेने पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दोन वेळा गर्भवती झाल्यानंतर मानसिक आणि भावनिक दबाव टाकून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा, तसेच इच्छेविरुद्ध कॉपर-टी बसवल्याचा गंभीर आरोपही महिलेने तक्रारीत केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

धनश्री निलेश भोसले, वय 33, सध्या सासवड येथे आई-वडिलांसोबत राहतात. त्यांच्या तक्रारीनुसार, 24 मे 2020 रोजी त्यांचा विवाह निलेश अरविंद भोसले यांच्याशी हिंदू रितीरिवाजानुसार झाला. दोघांची ओळख ‘तुमचं आमचं जमलं’ या विवाहविषयक संकेतस्थळाच्या माध्यमातून झाली होती. लग्नानंतर काही दिवसांतच पती निलेश, सासरे अरविंद धर्माजी भोसले आणि सासू सुलभा अरविंद भोसले यांच्याकडून टोमणे आणि अपमानास्पद बोलणे सुरू झाल्याचा आरोप आहे.

‘तुला स्वयंपाक करता येत नाही’, ‘तू दिसायला चांगली नाहीस’, ‘तुझ्या वडिलांनी लग्न लहान केले’ तसेच ‘मानपान केला नाही’, अशा शब्दांत आपल्याला वारंवार बोलले जात असल्याचे धनश्री यांनी तक्रारीत म्हटले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सासरे अरविंद भोसले यांनी पती-पत्नीला घराबाहेर काढल्याचा आरोप असून, त्यानंतर दोघे भाड्याच्या खोलीत राहत होते.

त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये धनश्री गर्भवती झाल्या. मात्र, आर्थिक परिस्थितीचे कारण देत पतीने डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करण्यास सांगितल्याचे त्यांनी म्हटले आहे. एप्रिल 2021 मध्ये पुन्हा गर्भधारणा झाल्यानंतरही पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व भावनिक दबाव आणून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीत 6 जुलै 2021 रोजीची आणखी एक गंभीर बाब नमूद आहे. पतीने आपल्या इच्छेविरुद्ध सातारा येथील लोकमान्य नर्सिंगहोममध्ये कॉपर-टी बसविल्याचा आरोप धनश्री यांनी केला आहे. याशिवाय पती आपल्यावर चारित्र्याचा संशय घेत असल्याने वारंवार वाद होत होते. या वादातून शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पतीकडून व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जात होती, तर सासरच्या मंडळींकडून चारचाकी वाहनाची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. सासरे आपल्याला ‘तुला मुलं होणार नाहीत, तुझी पत्रिका मी पाहिली आहे’, असे म्हणत अपमानित करत असल्याचेही महिलेने पोलिसांना सांगितले.

सततच्या त्रासाला कंटाळून 27 नोव्हेंबर 2021 रोजी आपल्याला घरातून हाकलून दिल्याचा आरोप धनश्री यांनी केला आहे. त्यानंतर त्या सासवड येथे आई-वडिलांसोबत राहत आहेत. दरम्यान, पती निलेश भोसले यांनी त्यांच्या विरोधात घटस्फोटाची केस दाखल केली असून, हे प्रकरण सध्या पुणे कौटुंबिक न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

धनश्री भोसले यांच्या तक्रारीवरून सासवड पोलिसांनी पती निलेश अरविंद भोसले, सासरे अरविंद धर्माजी भोसले आणि सासू सुलभा अरविंद भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि संपूर्ण घटनाक्रमाचा तपास पोलिसांकडून केला जात असून, महिला हवालदार भुजबळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!