फुले वाड्यातील वटपौर्णिमेवरून राजकीय रणकंदन! मेधा कुलकर्णींवर सुषमा अंधारेंचा संताप; ‘हा आक्रस्ताळेपणा नाही, तर…’

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक फुले वाड्यात भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाची पूजा केल्याने नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या या वास्तूमध्ये धार्मिक विधी पार पडल्याने विविध स्तरांतून आक्षेप नोंदवले जात आहेत. या प्रकरणावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत मेधा कुलकर्णींवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

अंधारे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये, “कोथरूडमधील अनेक वडांची झाडे सोडून मुद्दाम फुले वाड्यात येऊन पूजा करणे हा केवळ आक्रस्ताळेपणा नसून जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे,” असा आरोप केला. फुले दांपत्याने अंधश्रद्धा, कर्मकांड आणि सामाजिक विषमतेविरोधात आयुष्यभर लढा दिला. अशा ठिकाणी पारंपरिक धार्मिक विधी आयोजित होणे त्यांच्या विचारांशी विसंगत असल्याचे त्यांनी म्हटले.
याचबरोबर अंधारे यांनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. ऐतिहासिक वारशाचे संरक्षण करण्याऐवजी अशा घटनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच काही लोकप्रतिनिधी समाजात धार्मिक आणि सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणण्याचे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

राम मंदिरातील चोरी, पेपरफुटी, महिलांवरील अत्याचार आणि इतर गंभीर प्रश्नांवर मौन बाळगणारे स्वयंघोषित हिंदुत्ववादी अशा प्रतीकात्मक मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा टोला अंधारे यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर फुले वाड्यातील वटपौर्णिमेचा मुद्दा आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून आगामी काळात या वादावरून आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
