‘फोटोसाठी आले अन् घराचा तमाशा करून गेले’; चाहत्यांच्या धक्कादायक वागणुकीमुळे सूरज चव्हाणचा मोठा निर्णय

बारामती : चाहत्यांना देव मानणारा, प्रत्येकाला हसतमुखाने भेटणारा आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही जमिनीवर राहिलेला ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण अखेर संतापला आहे. काही चाहत्यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे त्याला आता कठोर भूमिका घ्यावी लागली असून, यापुढे रात्री कोणत्याही चाहत्यांना भेटणार नसल्याची स्पष्ट घोषणा त्याने केली आहे.

लोकप्रियतेमुळे सूरजच्या घराबाहेर नेहमीच चाहत्यांची गर्दी असते. सेल्फी, फोटो आणि भेटीसाठी अनेकजण दूरदूरवरून येतात. मात्र अलीकडे घडलेल्या काही घटनांनी सूरज आणि त्याच्या कुटुंबाचा संयम सुटल्याचे दिसून येत आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने काही धक्कादायक अनुभव सांगितले, ज्यामुळे चाहत्यांबद्दलची त्याची भूमिका बदलल्याचे स्पष्ट झाले.
सूरजने सांगितले की, काही लोक थेट रात्री उशिरा त्याच्या घरी पोहोचले. त्यातील काही जण मद्यधुंद अवस्थेत होते. एवढेच नव्हे तर एका व्यक्तीने गुटखा खाऊन घरातील बाथरूममध्ये उलटी केली. घरातील शांतता आणि वातावरण बिघडवणाऱ्या या प्रकारामुळे कुटुंबीय संतप्त झाले. विशेषतः पत्नीने यापुढे अशा प्रकारे घरात कुणालाही प्रवेश देऊ नये, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचे सूरजने सांगितले.

“मी माझ्या चाहत्यांना नेहमीच सन्मान दिला. त्यांच्या प्रेमामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. पण काही लोक प्रेमाच्या नावाखाली मर्यादा विसरत आहेत. चाहते माझ्या हृदयात आहेत, पण त्यांनी डोक्यावर बसू नये,” असे सूरजने भावनिक शब्दांत सांगितले.

बिग बॉस जिंकल्यानंतरचे दिवस आठवत तो म्हणाला की, अनेक रात्री त्याने झोप न घेता चाहत्यांसोबत फोटो काढण्यात घालवल्या. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त चाहत्यांना भेटणे, त्यांच्यासोबत वेळ घालवणे हेच त्याचे काम झाले होते. मात्र आता आयुष्यात कुटुंबाची जबाबदारी वाढली असून स्वतःसाठी आणि घरासाठी वेळ देणे आवश्यक असल्याचे त्याला वाटते.
याच कारणामुळे सूरजने आता स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “रात्रीच्या वेळी कुणीही घरी येऊ नका. सूरज भाऊ आता रात्री भेटणार नाही. प्रेम कायम राहील, पण त्यालाही काही मर्यादा असतात.”
दरम्यान, सूरजच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी त्याच्या निर्णयाचे समर्थन करत सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी चाहत्यांच्या अति उत्साहामुळे कलाकारांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या सूरजने घेतलेला हा निर्णय सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.