‘निवडणूक आयोगातलेच अधिकारी आरोप करतायत, मग विश्वास कुणावर ठेवायचा?’; सुप्रिया सुळेंचा सवाल, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यावरही मोठं वक्तव्य

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणिनिवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू व विवेक जोशी यांच्यात मतभेद असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. आयोगातीलच व्यक्ती निर्णयांवर आक्षेप घेत असतील, तर सामान्य नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवायचा, असा सवाल त्यांनी केला.
दोन निवडणूक आयुक्तांनी गेल्या दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर तब्बल १४ वेळा लेखी आक्षेप नोंदवल्याचे ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात म्हटले आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदारांची नावे वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, मतदार यादीच्या माहिती व्यवस्थेचे केंद्रीकरण आणि पश्चिम बंगालमधील मतदारांच्या नावांशी संबंधित अपील प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्यात आल्याचे या वृत्तात नमूद आहे. काही आक्षेपांमध्ये निर्णय आपल्याला माहिती नसताना घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हा केवळ राजकीय वाद नसल्याचे म्हटले. मतदानाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाच्या घटनात्मक अधिकाराशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रकरणावर सर्व राजकीय पक्षांना एकत्र बोलावून तातडीने चर्चा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगासारख्या संस्थेच्या कामकाजाबाबतच प्रश्न उपस्थित होत असतील, तर ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचे सुळे म्हणाल्या. इंडिया आघाडीचीही याबाबत बैठक होणार असल्याचे त्यांनी संकेत दिले.


ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा का, असा थेट प्रश्न सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी नैतिकता दाखवली पाहिजे, असे उत्तर दिले. मात्र, स्वतःहून राजीनाम्याची स्वतंत्र मागणी त्यांनी स्पष्टपणे केली नाही. केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक घेऊन या संपूर्ण प्रकरणावर खुलेपणाने चर्चा करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी मात्र आयोगातील निर्णयांबाबत वेगळी भूमिका मांडली आहे. विशेष मतदार यादी पुनरावलोकनाच्या प्रक्रियेसह आयोगाने घेतलेले निर्णय तिन्ही निवडणूक आयुक्तांच्या मंजुरीने आणि एकमताने झाले असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दोन आयुक्तांच्या आक्षेपांच्या वृत्तानंतर विरोधकांकडून उपस्थित होणारे प्रश्न आणि आयोगाकडून दिले जाणारे स्पष्टीकरण यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे स्वागत करताना, या दौऱ्यांनंतर शेतकऱ्यांच्या हातात ठोस मदत पडली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोहित पवार, जयंत पाटील, अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जात असल्याचा उल्लेख करत, दुष्काळाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.