उपमुख्यमंत्रिपदासह पक्षाध्यक्षपदही वादात! सुनेत्रा पवारांच्या निवडीला राष्ट्रवादीतूनच कायदेशीर आव्हान


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवडीला पक्षातीलच ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी कायदेशीर आव्हान दिले आहे. यामुळे पक्षात नव्या वादाला तोंड फुटले असून, राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर २०२३ मध्ये अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या निधनानंतर पक्षासमोर नव्या नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा झाली; परंतु कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या सर्वसाधारण सभेत सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याची घोषणा प्रफुल पटेल यांनी केली. राष्ट्रीय कार्यकारिणीने या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली होती.

मात्र, या निवडीच्या प्रक्रियेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. सच्चिदानंद सिंह यांनी ९ जुलै रोजी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला वकिलामार्फत नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत २६ फेब्रुवारी रोजी पार पडलेली अध्यक्षपदाची निवडणूक अवैध ठरवून ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोटिशीत सुनेत्रा पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल आणि पक्षाचे सचिव ब्रिजमोहन श्रीवास्तव यांचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली नव्याने निवडणूक घेण्यात यावी, तसेच तोपर्यंत विद्यमान पदाधिकाऱ्यांची सुधारित यादी अमान्य मानावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या घडामोडी अशा वेळी समोर आल्या आहेत, जेव्हा राज्यात शरद पवार यांच्या गटाच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील हा अंतर्गत वाद आगामी काळात कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!