पुणे हादरलं! फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या नाशिकच्या तरुणाची आत्महत्या..

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. बी.एससीच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडारवाडी इथल्या विष्णू कुंज वसतिगृहात विद्यार्थ्याने गुरुवारी (ता. २७) गळफास घेतला.

ओम कापडणे (वय 19 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार , ओम कापडणे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील आहे. तो शिक्षणासाठी पुण्यात आला होता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. तर विष्णू कुंज वसतिगृहात तो राहत होता.

याच वसतिगृहात त्याने गुरुवारी गळफास घेतला. या घटनेची माहिती मिळताच ओम कापडणेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान ओमने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. शिवाय वसतिगृहात ज्या खोलीत त्याने गळफास घेतला तिथे कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. त्यामुळे ओमने हे पाऊल का उचलले याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. पोलीस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.