साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रामधील ऊस शेतीमध्ये ‘एआय’चा तंत्रज्ञानाचा वापर करावा ! माळेगाव कारखान्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अजित पवार यांच्या हस्ते अनावरण…..

बारामती : साखर कारखान्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आणि शेतकरी मेळावा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन ॲड. केशवराव जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, रणजीत तावरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन राजवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याला रयतेचे राज्य म्हणून ओळखले जात होते. त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शांचे स्मरण करून राज्यशासन काम करत आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांच्या बाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याचे काम नेहमीच होणे गरजेचे असून माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 1984 साली उभारलेल्या या पुतळ्याचे नूतनीकरण करून घेतली आहे.
ते पुढे म्हणाले, या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकरी, उद्योग, आरोग्य, रोजगार, शिक्षण आदी बाबींना अधिकचे महत्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. विकास कामांवर परिणाम होऊ न देता महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कृषी पंपांना वीजबील माफी, लाडकी बहीण योजनेला निधीची तरतूद आदींसाठी तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याजाची सवलतीची सुमारे बाराशे कोटी रुपयांची रक्कम जिल्हा सहकारी बँकांना देण्यात आली असून त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्ज भरावे, असे आवाहनही त्यांनी केले. दुधाच्या अनुदानाची रक्कम दुग्ध संस्थांपर्यंत पोहोविण्यात येत असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यावर्षी ऊस पीकासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे (एआय) आधुनिक तंत्रज्ञान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने आणले असून त्याचा ऊस उत्पादनवाढीसाठी तसेच पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी मोठा फायदा होणार आहे. हे पाहता या वर्षीच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली असून आवश्यकतेनुसार पुढील पुरवणी मागण्यांमध्ये अधिकची तरतूद करण्यात येईल. एआय तंत्रज्ञान सोयाबीन, कापूस, केळी, फळबागा आदींसाठीही वापरण्यात येईल, असेही म्हणाले.
लवकरच पुण्यात ॲग्री हॅकेथॉन भरविण्यात येणार असून त्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, नवोद्योग (स्टार्टअप्स), कृषी तज्ज्ञ, शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसंबंधी समस्या सोडविण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने राज्य शासन करणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढेल, खर्च कसा कमी होईल यासाठी नवकल्पक संशोधकांना चालना मिळण्यासाठी या हॅकेथॉनचा उपयोग होणार असून येत्या जूनपर्यंत अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले.
माळेगाव संचालक मंडळाचे दादांकडून अभिनंदन !
माळेगाव कारखान्याने उच्च दराची परंपरा राखल्याबद्दल अभिनंदन करुन कारखान्याने २०२२-२३ मध्ये प्रतीक्विंटल ३ हजार ४११ रुपये, २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी राज्यात विक्रमी ३ हजार ६३६ रुपये दर दिला आहे. त्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.