श्रीमंतीचा असाही माज! लोणी काळभोरमध्ये अल्पवयीन मुलाने पोलिस ठाण्यासमोरील दुचाकी वाहने चिरडली..

लोणी काळभोर : महाराष्ट्र दिनाच्या सकाळीच लोणी काळभोरवासीयांनी थारचा थरार अनुभवला. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात थार चालवून पोलीस ठाण्यासमोर उभ्या असलेल्या शासकीय व खाजगी अशा एकुण १७ वाहनांना धडक देऊन मोठे नुकसान केले आहे. सुदैवाने यांत जिवीतहानी झाली नाही.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष रावसाहेब तांदळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन मालक नवनाथ पंडित सातव रा. तांबेवस्ती केसनंद ता. हवेली जी.पुणे) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची सविस्तर हकिकत अशी की १ मे रोजी पहाटे नवनाथ सातव यांच्या मालकीची महिंन्द्रा कंपनीचीं चारचाकी थार गाडी क्रमांक एमएच १२ व्हीव्ही ४१४१ ही देऊन त्यांच्या जवळच्या नात्यातील १७ वर्षे वयाचा अल्पवयीन मुलगा आपल्या तिन मित्रांसह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील तिर्थक्षेत्र रामदरा येथे दर्शनासाठी आला होता.

दर्शन झालेनंतर ते घराकडे परतत असताना सकाळी सुमारे ६.५५ वाजण्याच्या सुमारांस लोणी काळभोर गावातील दत्त मंदिर आणि लोणी फाटा यांच्या दरम्यान असलेल्या लोणी काळभोर लोणी पोलीस ठाण्यासमोर आले त्यावेळी अल्पवयीन थारचालकाचे त्याचे ताब्यातील वाहन स्वत:चे व इतरांचे जीवितास धोका निर्माण होईल व बेदरकारपणे व हलगर्जिपणाने चालवून गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पोलीस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्रादरम्यान उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींना धडकली. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु शासकीय व खाजगी अशा एकुण १७ वाहनांना धडक देऊन मोठे नुकसान केले आहे.

वाहन चालक अल्पवयीन असल्याची जाणीव असताना देखील व त्याचेकडे कोणताही कायदेशीर वाहन परवाना नसताना त्याचे ताब्यातील वाहन दिले या कारणांवरून वाहन मालक नवनाथ सातव यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर हे करत आहेत.