पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; 13 जून ते 26 जूनपर्यंत बंदी, पाहा सविस्तर नियम..

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या 14 दिवसांच्या कालावधीत जिल्हा पोलीस अधीक्षकांची किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास, सार्वजनिक सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशानुसार या कालावधीत शस्त्र, स्फोटक पदार्थ, धारदार शस्त्रे, तलवारी, बंदुका, काठ्या किंवा कोणतेही दाहक साहित्य बाळगण्यास सक्त मनाई असेल. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणारी किंवा समाजात तेढ निर्माण करणारी आवेशपूर्ण भाषणे, घोषणा किंवा चिथावणीखोर वक्तव्ये करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. हा आदेश केवळ सर्वसामान्य नागरिक आणि संघटनांसाठी लागू असेल, तर शासकीय कर्मचारी, पोलीस ऑन-ड्यूटी किंवा अधिकृत परवानगी असलेल्या व्यक्तींना यात सूट देण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक फौजदारी कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला असून नागरिकांनी शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.