मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’बाबत मोठा निर्णय; १ नोव्हेंबरपासून नवे नियम लागू, कोणत्या वाहनांना बंदी?

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बहुचर्चित मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ मार्गावरील वाहतुकीसंदर्भात महाराष्ट्र वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचे नवे नियम जाहीर केले आहेत.

या नियमांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे काही वाहनांना मिसिंग लिंकवरून प्रवास करता येणार नाही, तर कार आणि प्रवासी बससाठी वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.
कोणत्या वाहनांना प्रवेशबंदी?


नव्या नियमांनुसार, मिसिंग लिंकवरून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पिकअप व्हॅन, टाटा एससारखी छोटी मालवाहू वाहने तसेच अवजड ट्रक यांचाही समावेश आहे. याशिवाय ज्वलनशील, स्फोटक आणि अन्य धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावर प्रवेश करता येणार नाही.
या वाहनांना मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या जुन्या मार्गिकेचा वापर करावा लागणार आहे. बोगद्यांमधील सुरक्षितता, तांत्रिक बाबी आणि वाहतूक कोंडी टाळण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
कार आणि बससाठी वेगमर्यादा निश्चित
मिसिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कमाल वेगमर्यादा पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.
खासगी कार आणि हलकी खासगी वाहने: ताशी १०० किलोमीटर
प्रवासी बस आणि अन्य प्रवासी वाहने: ताशी ८० किलोमीटर
वाहनचालकांनी निश्चित केलेल्या वेगमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. हे नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
वाहनचालकांनी काय लक्षात ठेवावे?
मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासापूर्वी आपल्या वाहनाला मिसिंग लिंकवर प्रवेशाची परवानगी आहे की नाही, याची खात्री करून घ्यावी. मालवाहू वाहनचालकांनी जुन्या मार्गिकेचा वापर करण्याचे नियोजन करावे. तसेच कार आणि बसचालकांनी निर्धारित वेगमर्यादा पाळावी.
नव्या नियमांमुळे मिसिंग लिंकवरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी या बदलांची नोंद घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
