दिवाळीच्या सुट्टीत एसटीचा मोठा दिलासा; पुण्यातून १२०० जादा बस, कोणत्या मार्गांवर धावणार?

पुणे : दिवाळीच्या सणानिमित्त अनेक नागरिक गावी जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे रेल्वे आणि एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत खासगी बसच्या तिकिटांचे दरही वाढत असल्याने प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन पुणे एसटी विभागाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी १ हजार २०० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान जादा बस धावणार
दिवाळीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ४ ते ७ नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील विविध बसस्थानकांतून विशेष बसफेऱ्या चालवण्यात येणार आहेत. स्वारगेट, वाकडेवाडी आणि पिंपरी-चिंचवड येथून या जादा बस सोडण्यात येतील. प्रवाशांना बसचे ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.


विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशासाठी विशेष नियोजन
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी पिंपरी-चिंचवड आगारातून ९०० हून अधिक बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी या भागांसाठी खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातून बस सोडण्यात येत होत्या. मात्र, प्रवाशांच्या सोयीचा विचार करून यंदा पिंपरी-चिंचवड आगाराला प्राधान्य देण्यात आले आहे. हे आगार मेट्रोशी जोडलेले असल्याने प्रवाशांना तेथे पोहोचणे अधिक सोयीचे ठरणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रासाठीही जादा बस
सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या मार्गांवर ३०० जादा बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट आणि वाकडेवाडी येथून या मार्गांवरील विशेष बसफेऱ्या चालवण्यात येतील. जादा बस सोडण्याबरोबरच एसटीच्या नियमित फेऱ्याही सुरू राहणार आहेत.
पुणे एसटी विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी ही माहिती दिली. दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांनी शेवटच्या क्षणाची धावपळ टाळण्यासाठी आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहन एसटी विभागाकडून करण्यात आले आहे. जादा बसच्या नियोजनामुळे सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
