पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याने, काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल..

पुणे: जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या झाशीची राणी चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ऋषिकेश उर्फ बंटी बाबा शेळके, प्रथमेश विकास आबनावे, एहसान अहमद खान, मुरलीधर सिद्धाराम बुधरामस, राहुल दुर्योधन शिरसाट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २६) सायंकाळी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या झाशीची राणी चौकात पंतप्रधानांचा पुतळा जाळला आहे.
पेटवलेला हा पुतळा घेऊन कार्यकर्ते रस्त्याने पळत होते. बंदोबस्तावरील पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखले. त्यांना ताब्यात घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांनी दिली आहे.