श्रावणातील तिसऱ्या सोमवारी मंदिरात चेंगराचेंगरी; 7 भाविकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

बिहार : बिहारमधील लखीसराय जिल्ह्यातील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीत सात भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास मंदिरातील बॅरिकेडजवळ विजेचा खांब पडल्याची घटना घडली. त्यानंतर विजेचा शॉक लागत असल्याची अफवा भाविकांमध्ये पसरली. त्यामुळे अचानक मोठ्या संख्येने भाविकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावाधाव सुरू केली.

या गोंधळात मंदिरातील बॅरिकेड्सही पडले. अनेक भाविक एकमेकांवर पडल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.


घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी भाविकांना जवळच्या रुग्णालयात आणि आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, काही जखमींना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मृतांची नावे समोर
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांमध्ये मनमाला देवी (44), रिंकू देवी (50), हेमलता देवी (55), ललिता देवी (45), सोनी देवी (50) आणि संगिता देवी (40) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. एका मृताची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, विजेचा खांब कोसळल्यानंतर शॉक लागत असल्याची अफवा वेगाने पसरली आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर झालेल्या धावपळीत अनेक जण जखमी झाले.
अशोकधाम मंदिरातील या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे तसेच मृत आणि जखमींची माहिती निश्चित करण्याचे काम सुरू आहे.