शिरूर-हवेलीतील जनसप्ताहाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १०,३८५ नागरिकांनी घेतला मोफत आरोग्यसेवेचा लाभ

शिरूर : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार माऊली आबा कटके यांच्या नेतृत्वाखाली शिरूर-हवेली मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या जनसप्ताह उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मतदारसंघातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयोजित मोफत आरोग्य शिबिरांमधून एकूण १०,३८५ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला.
जनसप्ताहांतर्गत नागरिकांसाठी नेत्ररोग, दंतरोग, बालरोग, अस्थिरोग, फिजिओथेरपी, ईसीजी, रक्त तपासणी, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तपासणी, माता व बाल आरोग्य सेवा, गर्भवती मातांची विशेष तपासणी, संसर्गजन्य आजार तपासणी तसेच हिमोग्लोबिन, HBsAg, VDRL, मोतीबिंदू आदी विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. यासोबतच तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन व आवश्यक उपचारांबाबत सल्लाही देण्यात आला.

मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८,४३९ नागरिकांनी, तर ग्रामीण रुग्णालयांमध्ये १,९४६ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. अनेक रुग्णांमध्ये आजारांचे प्राथमिक निदान झाल्याने त्यांच्यावर वेळेत उपचार सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.


याबाबत आमदार माऊली आबा कटके म्हणाले, “नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहणे हीच खरी लोकसेवा आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या गावातच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी असे लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”
जनसप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि सर्व संबंधित यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल आमदार माऊली आबा कटके यांनी त्यांचे आभार मानले.