हवेलीच्या मोजणी कार्यालयात विशेष तक्रार निवारण दिन, नागरिकांच्या तक्रारींचे प्रत्यक्ष भेटून होणार निवारण, महसूलमंत्र्यांच्या निर्णयाचा होणार फायदा…

उरुळी कांचन : हवेली तालुका मोजणी कार्यालयाने १६ व १७ मे रोजी ‘विशेष तक्रार निवारण दिन’ आयोजित केला आहे. तसेच हवेली तालुक्यातील नागरिकांनी मोजणी संदर्भातील तक्रारी समक्ष उपस्थित राहून करण्याचे आवाहन हवेली भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक अमित ननावरे यांनी केले आहे.
तसेच १६ व १७ मे रोजी हवेलीतील नागरिकांनी कागदपत्रांच्या पुराव्यानिशी आपल्या तक्रारी या विशेष दिनी दाखल कराव्यात. जास्तीत जास्त नागरिकांनी या विशेष दिनाचा लाभ घेऊन यामध्ये सहभागी व्हावे. तसेच संबंधित तक्रारींचे निवारण मोजणी कार्यालयाकडून करण्यात येणार असल्याचे हवेली मोजणी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत महसूलमंत्री यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. चुकीची कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याचा सज्जड दम त्यांनी आयुक्तालयातील बैठकीत दिला आहे.
तसेच हवेलीतील तक्रारदार नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी शक्य झाल्यास स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली आहे. त्यामुळे मोजणी कार्यालयातील नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी महसूलमंत्री उपस्थित राहणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा अधीक्षक व आता उपसंचालकपदी पदोन्नती झालेले सुर्यकांत मोरे यांच्याविरोधात तक्रारी वाढल्याने त्यांची कार्यालयीन चौकशी सुरू आहे. तसेच हवेलीचे निलंबित उपअधिक्षक व त्यांच्या कार्यालयातील काळ्या कारनाम्यात सामील असलेल्या टोळीतील भूकरमापकांच्या पराक्रमामुळे मोजणी विभागाची बदनामी संपूर्ण महाराष्ट्राभर झाली आहे.
दरम्यान, यामुळे आक्रमक झालेल्या महसूलमंत्र्यांनी जमाबंदी आयुक्त आणि संचालक कार्यालय, उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पुण्यातील आपल्या दौऱ्यात महसूलमंत्री यांनी तक्रारदार नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या. तसेच जमाबंदी आयुक्त कार्यालयासहीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिल्याने भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.