इंडियाच्या बैठकीत नेत्यांना खास मेजवानी! वडापाव, झुणका भाकर, पुरणपोळी आणि बरच काही…

नवी दिली : इंडिया आघाडीच्या आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे. देशातील २८ पक्ष सदस्य ६४ या बैठकीला उपस्थित राहत आहेत. आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होईल. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. २८ पक्षांचे नेते येणार आहेत. विविध राज्यातील हे नेते आहेत.

मात्र, असं असलं तरी या नेत्यांना खास मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद चाखायला मिळणार आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणासाठी वडापाव, झुणकाभाकर, पुरणपोळी, श्रीखंड पुरी, भरलेले वांगी असे मराठमोळे खाद्यपदार्थच ठेवण्यात आले आहेत. वडापाव आणि झुणका भाकरपासून ते पुरणपोळीपर्यंतच्या पारंपारिक आणि मराठी पदार्थांवर पाहुण्यांना ताव मारता येणार आहे.
आज संध्याकाळी ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होत असून देशभरातील महत्त्वाचे नेते आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचे आयोजन केलं आहे. या नेत्यांसाठी नाश्त्याला बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स आणि वडापाव ठेवण्यात आला आहे.

तसेच सोबत चहा आणि कॉफींसह नारळपाणी, लिंबूपाणी तसेच फळांचा रसही ठेवण्यात आला आहे. पाहुण्यांसाठी स्वीट डिशमध्ये नारळाची करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय पाहुण्यांना गरमागरम पुरणपोळीचा अस्वादही चाखता येणार आहेत. या पाहुण्यांसाठी झुणका भाकरही ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्यासहीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेलही यावेळी असणार आहे.
ग्रँड हयात हॉटेलमध्ये १०० हून अधिक रुम बुक करण्यात आले आहेत. हॉटेलच्या आसपासच्या हॉटेलमधील रुमही बुक करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असली तरी उद्धव ठाकरे हेच या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व करत आहेत.