पुण्यात दिवाळीच्या जल्लोषात आगींचा भडका; लक्ष्मीपूजनाच्या रात्री ६४ घटना, कुठे काय घडलं?


पुणे : दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे पुणे शहर आणि उपनगरांमध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.

रविवारी (८ नोव्हेंबर) दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत अग्निशमन दलाला आगीच्या तब्बल ६४ घटनांची माहिती मिळाली. घरांच्या गॅलरी, इमारतींमधील फ्लॅट, झाडे, गवत, कचरा, दुकाने, गोदामे आणि वाहनांना आग लागल्याच्या घटनांचा यामध्ये समावेश आहे.

दुपारी ३ ते रात्री ११ पर्यंत आगीच्या ६४ घटना

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागरिकांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडले. मात्र, फटाके फोडताना घेतलेल्या निष्काळजीपणामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. पहिली घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास कोंढव्यातील कडनगर चौकात घडली. येथील एका पडीक इमारतीच्या तळघरातील साहित्याला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर रात्री अकरापर्यंत शहराच्या विविध भागांतून आगीच्या ६४ वर्दी प्राप्त झाल्या.

शहरासह उपनगरांमध्ये अग्निशमन दलाची धावपळ

शिवाजीनगर, काशेवाडी, सदाशिव पेठ, नाना पेठ, शुक्रवार पेठ, गंज पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ आणि रेंजहिल्स परिसरात आगीच्या घटना घडल्या. तसेच कोंढवा, धायरी, खराडी, कोथरूड, कात्रज, वारजे, बाणेर, औंध, विमाननगर, धानोरी, उंड्री, केशवनगर आणि टिंगरेनगर परिसरातही अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

काही ठिकाणी घरांच्या गॅलरी, इमारतींचे छत आणि फ्लॅटमधील साहित्याने पेट घेतला. फुरसुंगी येथील गोदाम, दगडूशेठ मंदिर परिसरातील दुकान आणि सिंहगड रस्त्यावरील एका वाहनालाही आग लागली. याशिवाय शहरातील विविध भागांमध्ये झाडे, गवत आणि कचऱ्याला आग लागल्याच्या घटना समोर आल्या.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व ठिकाणी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही.

सुरक्षित दिवाळी मोहिमेनंतरही आगीच्या घटना

दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी अग्निशमन दलाकडून यंदा ‘सुरक्षित दिवाळी’ मोहीम राबवण्यात आली होती. ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळपासून आगीच्या घटनांचे सत्र सुरूच राहिले. त्यामुळे फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!