४० वर्षांनंतरही जिवंत सामाजिक बांधिलकी; पी.के.एम. हायस्कूलच्या १९८६ बॅचकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांट भेट

लोणी काळभोर : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटल्यानंतरही आपल्या गावाशी, परिसराशी आणि समाजाशी असलेली नाळ जपणे ही मोठी गोष्ट असून, अशा सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतून समाजाला प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांनी केले.

येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कवडीपाट (कदमवाकवस्ती) येथील ‘समर्पण वृद्धाश्रम’मध्ये बसविलेल्या आरओ जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण प्रमोद रासकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. राहुल झेंडे, समर्पणचे कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, सखाराम घाडगे, डॉ. लक्ष्मण मासाळ, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बापू काळभोर तसेच १९८६ च्या बॅचचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमोद रासकर म्हणाले, “हा केवळ जलशुद्धीकरण यंत्रणेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम नसून कृतज्ञता, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा उत्सव आहे. ‘पाणी हेच जीवन’ असे आपण म्हणतो; मात्र शुद्ध पाणी हे आरोग्यदायी जीवनाचे मूळ आहे.

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामागील भावना अत्यंत उदात्त आहे. ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे म्हणजे एका अर्थाने ईश्वरसेवाच आहे.”
या उपक्रमामुळे आजच्या तरुण पिढीला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.