सिया-केतन प्रकरणाचा थेट लग्नाच्या मार्केटवर परिणाम! समाजात उदयाला आला ‘हा’ नवा ट्रेंड

पुणे : लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर अरेंज मॅरेज करणाऱ्या कुटुंबांमध्ये मोठा बदल पाहायला मिळत आहे. लग्न ठरवण्यापूर्वी केवळ मुलगा किंवा मुलीची प्राथमिक माहिती, नातेवाईकांचे मत किंवा पत्रिकेवर विश्वास न ठेवता आता अनेक पालक भावी जावई किंवा सुनेची सखोल पार्श्वभूमी तपासून घेत आहेत. यासाठी खासगी गुप्तहेरांची मदत घेण्याचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे समोर आले आहे. विशेषतः उच्चभ्रू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबांमध्ये हा नवा ट्रेंड वेगाने वाढत आहे.
प्रत्येक गोष्टीची केली जाते गुप्त चौकशी
केतन अग्रवाल प्रकरणानंतर तसेच देशभरात घडलेल्या काही गाजलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांनी लग्नाच्या निर्णयाबाबत अधिक सतर्क भूमिका घेतली आहे. भावी जोडीदाराचा स्वभाव, चारित्र्य, व्यसनाधीनता, मित्रपरिवार, शैक्षणिक पात्रता, नोकरी, पगार, आर्थिक स्थिती, कर्ज, पूर्वीचे प्रेमसंबंध, सोशल मीडियावरील वर्तन आणि कुटुंबाची सामाजिक प्रतिमा अशा अनेक बाबींची गुप्तपणे चौकशी केली जात आहे.

खासगी गुप्तहेर संबंधित व्यक्तीच्या कार्यालयात, मित्रपरिवारात आणि परिसरात चौकशी करून अहवाल तयार करतात. हा अहवाल समाधानकारक असल्यासच लग्नाची बोलणी पुढे नेण्याचा कल वाढत आहे.


‘ट्रस्ट व्हेरिफिकेशन’ला वाढते महत्त्व
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, एखादी धक्कादायक घटना मोठ्या प्रमाणात चर्चेत आली की समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते. अशा घटना सतत घडत असल्याची भावना लोकांच्या मनात तयार होते. त्यामुळे पालक आता कोणतीही जोखीम न पत्करता ‘ट्रस्ट व्हेरिफिकेशन’ करण्यावर भर देत आहेत.
लाखो रुपये खर्च करण्याची तयारी
माहितीनुसार, काही कुटुंबे लग्नापूर्वीच भावी जोडीदाराची माहिती मिळवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यासही तयार आहेत. आर्थिक व्यवहार, कर्जबाजारीपणा, वैयक्तिक सवयी, सामाजिक वर्तणूक, पूर्वीचे संबंध आणि इतर महत्त्वाच्या बाबींची पडताळणी करण्याची मागणी गुप्तहेरांकडे केली जात आहे.
गुप्तहेरांचा अहवाल मिळाल्यानंतरच लग्नाचा निर्णय घेतला जात असून, अहवालात संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधित स्थळ नाकारण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे आता अरेंज मॅरेजमध्ये केवळ पत्रिका जुळवण्यापेक्षा विश्वासाची खात्री करूनच नाते पुढे नेण्याकडे कुटुंबांचा कल वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.