सिया गोयलच्या वडिलांचा मोठा खुलासा; ‘उदयपूरचा महाल, दोन विमाने… सगळंच खोटं

पुणे : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील धक्कादायक तपशील समोर येत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या आई-वडिलांनी प्रथमच माध्यमांसमोर येत अनेक चर्चांवर पडदा टाकला असून, सिया दोषी आढळल्यास तिला फाशीची शिक्षा व्हावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

केतन अग्रवाल याचा लोहगडावरून दरीत ढकलून खून केल्याचा आरोप सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, 18 जून रोजी चेतन चौधरी लोहगडावर पोहोचला होता. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, त्याने स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी एका दुकानातील कर्मचाऱ्याचा मोबाईल स्वतःजवळ ठेवला होता आणि त्याच फोनवरून तो सिया गोयलच्या संपर्कात होता. या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी नीरज कुमार याला माफीचा साक्षीदार केले आहे.
दरम्यान, केतन आणि सियाच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये महाल बुक करण्यात आला होता, तसेच नातेवाईकांच्या प्रवासासाठी दोन खासगी विमाने आरक्षित करण्यात आली होती, अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र, या सर्व दाव्यांचे सिया गोयलच्या वडिलांनी खंडन केले आहे.

मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, उदयपूरमध्ये महाल किंवा दोन विमाने बुक करण्यात आली नव्हती. लग्नाचा एकूण खर्च सुमारे साडेचार ते पाच कोटी रुपयांपर्यंत अपेक्षित होता आणि त्यामध्ये सर्व विधी व कार्यक्रमांचा समावेश होता. दोन्ही कुटुंबांकडून काही सोन्याचे दागिने एकमेकांना देण्यात आले होते, मात्र घटना उघडकीस आल्यानंतर अग्रवाल कुटुंबीयांनी दिलेले सर्व दागिने परत करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सियाच्या आईनेही याबाबत भूमिका मांडताना सांगितले की, तिच्याकडे केवळ साखरपुड्याची अंगठी आणि एक ब्रेसलेट आहे. त्याशिवाय अग्रवाल कुटुंबीयांनी दिलेली कोणतीही वस्तू आता त्यांच्याकडे नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “आम्हाला या घटनेची कोणतीही कल्पना नव्हती. सिया दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि आमचाही या प्रकरणाशी काही संबंध आढळला तर आम्हालाही शिक्षा करा,” असे भावनिक वक्तव्य सियाच्या आई-वडिलांनी केले.
दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आल्यानंतर सियाच्या वडिलांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. या हत्याकांडाचा तपास सुरू असून पोलिसांकडून विविध पुरावे आणि आरोपींच्या भूमिकेचा सखोल तपास केला जात आहे.