राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडींना वेग; रात्री आमदारांशी चर्चा, आज सुनेत्रा पवारांची कोअर कमिटीसोबत बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत नाराजी आणि मतभेदांच्या चर्चा सुरू आहेत. महायुती सरकारमध्ये सहभागी असूनही पक्षाला अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याची भावना काही नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पक्षातील आमदारांशी संवाद साधला. या बैठकीत आमदारांनी भाजपकडून होत असलेली कथित दादागिरी, विकासकामांसाठी निधीची कमतरता आणि स्थानिक पातळीवरील राजकीय हस्तक्षेपाबाबत नाराजी व्यक्त केली.
आमदारांनी मांडल्या तक्रारींचा पाढा

सुनेत्रा पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अनेक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील अडचणी मांडल्या. महायुतीत असूनही भाजपकडून राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना काम करू दिले जात नसल्याची तक्रार काही आमदारांनी केली. निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात आले. नाशिकमधील एका आमदाराने निधी मिळत नसेल, तर निवडून येताना मिळालेल्या मतांच्या फरकाइतक्याच मतांनी पराभव होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी भावना व्यक्त केली.

साताऱ्यातील राजकीय घडामोडींचाही उल्लेख
सातारा जिल्ह्यातील मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यात भाजपकडून होत असलेल्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आलेल्या अडचणींची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्यामागील राजकीय परिस्थितीही त्यांनी स्पष्ट केली.
कुंभमेळ्याच्या कामात राष्ट्रवादीला डावलल्याची तक्रार
नाशिकमधील महिला आमदार सरोज अहिरे यांनीही बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील विकासकामांसह नुकत्याच सुरू झालेल्या कुंभमेळ्याच्या कामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पुरेसे प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. भाजपकडून पक्षाला डावलले जात असल्याची तक्रारही त्यांनी केली.
सुनेत्रा पवारांच्या बैठकींना वेग
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा नेतृत्व आणि ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठकांना वेग आला आहे. पक्षातील समन्वय, महायुतीमधील स्थान आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा सुरू आहे. अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावे, यासाठी पक्षातील काही नेते आग्रही असल्याचीही चर्चा आहे. यासंदर्भात काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती आहे.
आज पुन्हा कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
या घडामोडींदरम्यान आज सकाळी ९ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत पक्षांतर्गत नाराजी, युवा आणि ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेद तसेच महायुतीतील समन्वय या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
बैठक सुरू होण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आमदारांना बैठकीत अनावश्यक राजकीय चर्चा किंवा गोंधळ न करता आपापल्या तक्रारी मांडण्याच्या सूचना दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आमदारांनी शांततेत आपले प्रश्न आणि अडचणी मांडल्या. आता कोअर कमिटीच्या बैठकीत या नाराजीवर काय तोडगा निघतो आणि पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत कोणते निर्णय घेतले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
