मेडिकल रिपोर्ट दाखवा, नवरदेवाचा ‘तो’ आजार समजताच नवरी हादरली; क्षणात थांबला विवाहसोहळा


उत्तर प्रदेश : बँड, बाजा, वऱ्हाड आणि आनंदाच्या वातावरणात सुरू असलेला विवाहसोहळा काही क्षणांतच रणांगणात बदलला. वरमाला होण्याआधीच नवरदेव अचानक मंडपात कोसळला आणि त्यानंतर नवरीने घेतलेल्या एका निर्णयाने सगळेच हादरले. “वराचा मेडिकल रिपोर्ट दाखवा, नाहीतर लग्न होणार नाही,” अशी ठाम भूमिका घेत नवरीने थेट लग्नालाच नकार दिला. अखेर मोठ्या थाटामाटात आलेल्या वरातीला वधूशिवायच परत जावे लागले.

ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील साकीत परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेव हा काटोली गावचा रहिवासी असून रविवारी संध्याकाळी वऱ्हाडासह एका गेस्ट हाऊसमध्ये विवाहासाठी पोहोचला होता. नागला फुले गावातील युवतीसोबत त्याचा विवाह होणार होता. सुरुवातीला सर्व विधी उत्साहात सुरू होते. मात्र लग्नाच्या मुख्य विधीदरम्यान अचानक वराचा तोल गेला आणि तो खुर्चीवरून खाली पडला. यानंतर मंडपात एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी डॉक्टरांना बोलावण्यासाठी धाव घेतली. सुरुवातीला वराच्या कुटुंबीयांनी “घाबरल्यामुळे चक्कर आली” असे सांगत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेनंतर नवरीच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी आरोप केला की, लग्न ठरवताना वराच्या आजाराची माहिती मुद्दाम लपवण्यात आली होती.

यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि नातेवाईकांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. “वराचा हेल्थ रिपोर्ट दाखवला तरच लग्न होईल,” अशी अट तिने घातली. मात्र वराच्या कुटुंबीयांकडून कोणताही स्पष्ट अहवाल न दाखवल्याने अखेर नवरीने लग्नास नकार दिला.

दरम्यान, हा वाद वाढल्यानंतर पोलिसांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बाजूंतील काही सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अनेकांनी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, पण नवरी आणि तिचे कुटुंब लग्न न करण्याच्या निर्णयावर कायम राहिले. अखेर मोठ्या गाजावाजात आलेली वरात वधूशिवायच परत गेल्याने परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!