चौफुला कला केंद्रावर गोळीबार प्रकरण! सत्ताधारी आमदाराच्या भावाचा सहभाग असल्याची चर्चा, नेमकं प्रकरण काय?


दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील बहुचर्चित कला केंद्रावर दोन दिवसांपूर्वी रात्री उशिरा गोळीबाराची झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

तसेच या प्रकरणात पुणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील एका आमदाराच्या भावाचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित आमदार महायुतीतील एका वरिष्ठ नेत्याचे निकटवर्तीय असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जात आहे.

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर आवाज उठवल्याने आता हे प्रकरण अधिक चर्चेत येऊ लागले आहे. या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला असून, लवकरच सत्य समोर येईल, अशी माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर प्रकरण दडपण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला, मात्र आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गोळीबार हवेत झाल्याचे सांगितले जात असले तरी, एका नृत्यांगना जखमी झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे या घटनेचे गूढ अधिकच वाढले आहे. स्थानिक यवत पोलिसांसह गुन्हे अन्वेषण पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. दोन दिवसांनंतरही ही घटना दडपण्याचा प्रयत्न का झाला, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!