नाशिक प्रकरणात खळबळजनक वळण! धार्मिक ‘ब्रेनवॉश’पासून १७१ लिंकपर्यंतचे धक्कादायक आरोप; SIT तपासाला वेग

नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील एका पीडितेवर अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणात संशयित निदा एजाज खान हिच्या चौकशीला विशेष तपास पथकाने (SIT) वेग दिला असून, तपासात अनेक गंभीर आणि धक्कादायक बाबी समोर येत असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणामुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, निदा खानने पीडितेच्या घरात जाऊन तिच्या धर्माशी संबंधित विधी केल्याचा तसेच तिला त्या पद्धतीने प्रार्थना व वर्तन करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. याशिवाय पीडितेचे विचार बदलण्यासाठी धार्मिक विषयांवरील तब्बल १७१ लिंक पाठवल्याचेही तपासात उघड झाले आहे.
देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात २६ मार्चपासून फरार असलेल्या निदा खानचा जामीन अर्ज २ मे रोजी नाशिकरोड न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून तिला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर ट्रान्झिट रिमांडवर नाशिकमध्ये आणण्यात आले. ८ मे रोजी न्यायालयाने तिला ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

आज, सोमवारी (११ मे) तिला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून, तिच्या पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास अधिक तीव्र करताना SIT कडून संबंधित संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचाही ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या तिघांची एकत्रित चौकशी केल्यास आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तपासात पुढे असेही समोर आले आहे की, पीडितेचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तसेच धार्मिक मतपरिवर्तनासाठी सतत दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही आहे. निदा खानने पीडितेच्या घरी जाऊन धार्मिक शिक्षण देणे, तिच्या धर्मातील पोशाख परिधान करण्यास भाग पाडणे आणि विशिष्ट प्रार्थना करण्यास प्रवृत्त करणे असे प्रकार केल्याचा संशय तपासात व्यक्त केला जात आहे.
निदा खानच्या अटकेसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्देही समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तिला लपण्यासाठी दिलेला फ्लॅट एका स्थानिक नगरसेवकाशी संबंधित असल्याच्या चर्चाही तपासात आहेत, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच ती गर्भवती असल्याने तिच्यासोबत कुटुंबीयही त्या काळात संभाजीनगरमध्ये उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे.
याशिवाय निदा खान विविध राजकीय आणि सामाजिक व्यक्तींशी संपर्कात होती का, तिला आर्थिक मदत कोणाकडून मिळाली, याचाही तपास सुरू आहे. नाशिकमध्ये तिच्याविरोधात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कंपनीतील कथित अत्याचार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांखाली हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
सध्या SIT या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.