पुण्यात धक्कादायक घटना! १८ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करून खून? माहेरच्यांचा गंभीर आरोप


पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या १८ वर्षांच्या विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करून विष देत हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. प्रेमविवाह करून संसार थाटलेल्या या तरुणीचे आयुष्य अवघ्या दोन वर्षांत संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणीचे नाव श्रुती सुनील बनसोडे असे असून, २८ मार्च २०२४ रोजी तिचा विवाह बुद्धभूषण गायकवाड याच्यासोबत झाला होता. श्रुती आणि बुद्धभूषण यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातूनच त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लग्नाच्या वेळी श्रुतीचे वय अवघे १६ वर्षे असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने सुरुवातीला कुटुंबीयांनी विरोध केला होता, मात्र सामाजिक बदनामीच्या भीतीने अखेर त्यांनी लग्नास संमती दिली.

लग्नानंतर काही दिवसांतच श्रुतीचा छळ सुरू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता, असे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, पोलिसांत तक्रार केल्यास श्रुतीचे काही खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली जात होती. या भीतीमुळे श्रुती आणि तिचे कुटुंब बराच काळ शांत राहिल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, ४ मे रोजी श्रुतीची प्रकृती अचानक बिघडली. तिला उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाल्यानंतर पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान ५ मे २०२६ रोजी तिचा मृत्यू झाला. श्रुतीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिला जेवणातून विष देण्यात आले, असा गंभीर आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.

श्रुतीचा पती, सासू-सासरे आणि दीर यांनी मिळून तिचा छळ केला आणि तिला मृत्यूच्या दारात ढकलले, असा दावा नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषींवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

या घटनेमुळे कोथरूड परिसरात संतापाची लाट पसरली असून, पोलिस तपासातून नेमकं सत्य काय समोर येतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!