धक्कादायक! हगवणे प्रकरणानंतर चंद्रपूरमध्ये हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेच टोकाचं पाऊल

चंद्रपूर : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. केवळ हुंड्यासाठी वैष्णवीला आपलं आयुष्य संपवाव लागल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता चंद्रपूरमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली शिवा रायपूरे (वय 32)असे मृत महिलेचे नाव आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये तिचे शिवा रायपुरे या व्यक्तीशी लग्न झाले. सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. मात्र सासरच्या मंडळीने खरा रंग दाखवत माहेरून पैसा आणण्याचा तगादा लावला. या त्रासाला कंटाळून वैशाली 2023 मध्ये माहेरी गेली. काही महिन्यानंतर पती शिवा याने सासर गाठले. हुंड्यासाठी त्रास होणार नाही याची हमी दिली. त्यानंतर वैशाली सासरला गेली. मात्र त्रास थांबला नाही. याला कंटाळून तिने 22 जूनला पंख्याला गळफास लावून जीवन संपवले.
याबाबत पोलिसांनी केलेल्या तपासात मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची बाब समोर आली. यानंतर रामनगर पोलिसांनी पती, सासू आणि दिरावर गुन्हा दाखल केला होता. घटनेपासून हे तिघेही फरार आहेत. पती शिवा भाऊराव रायपुरे (वय ३२), सासू तिलोतमा भाऊराव रायपुरे (६०), दीर दीपक भाऊराव रायपुरे (२८) अशी फरार आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी शोधपत्रिका जाहीर केली आहे.आरोपी दिसून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
