प्रेम, लग्न आणि मृत्यूचं गूढ! केतन प्रकरणात दोन कुटुंबांना जोडणाऱ्या ‘डबल वेडिंग’चा धक्कादायक तपशील समोर

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आता या प्रकरणात दोन कुटुंबांना एकाच वेळी जोडणाऱ्या ‘डबल वेडिंग’चा धागा उलगडल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह ठरलेला असतानाच, केतनच्या बहिणीचा विवाह सियाचा भाऊ साहिल गोयल याच्यासोबतही निश्चित करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी नोव्हेंबर महिन्यात हे दोन्ही विवाह सोहळे पार पडणार होते. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती आणि दोन्ही कुटुंबांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. विशेष म्हणजे, विवाहपूर्व छायाचित्रणासाठी ६ जून रोजी बाली येथे विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केतन-सिया यांच्यासोबत साहिल गोयल आणि केतनची बहीणही सहभागी होणार होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांचे नाते आणखी घट्ट होणार असल्याचे चित्र होते.
दरम्यान, तपासादरम्यान सियाचा भाऊ साहिल गोयल याच्या भूमिकेचीही पडताळणी सुरू करण्यात आली आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यातील कथित संबंधांची माहिती साहिलला आधीपासून होती का, तसेच त्याने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती का, याचा शोध पोलीस घेत आहेत. या अनुषंगाने काही महत्त्वाच्या बाबींची चौकशी सुरू असल्याचे समजते.

या प्रकरणात पोलिसांच्या तपासानुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ला परिसरात केतन अग्रवालला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर आहे. या घटनेनंतर समोर येत असलेल्या नव्या माहितीमुळे प्रकरण अधिकच गूढ बनले आहे.

एकीकडे दोन कुटुंबांच्या दुहेरी विवाहाची तयारी सुरू होती, तर दुसरीकडे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा आता प्रत्येक नातेसंबंध, संवाद आणि घडामोडींचा बारकाईने मागोवा घेत असून, पुढील काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.